छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत अनेक लहान मोठे किल्ले जिंकले होते त्यातीलच एक महत्वाचा किल्ला म्हणजे “वेल्लोरचा किल्ला”...
हा किल्ला जिजींच्या उत्तरेकडे आहे आणि किल्ल्याच्या चहुबाजूंनी पाण्याचे खंदक आहेत या किल्ल्यास मराठ्यांनी जून १६७७ पासून वेढा घातला होता पण किल्ल्यावर असलेल्या मुबलक शिबंदीमुळे किलेदार अब्दुल्लाखान किल्ला चांगलाच लढवत होता. किल्ल्याच्या बाजूला असलेल्या दोन टेकड्यांवर मराठ्यांनी साजीरा आणि गोजीरा या दोन गढ्या बांधल्या आणि तिथून तोफा डागू लागले तरीही अब्दुल्लाखान किल्ला सोडत नव्हता पण शेवटी १४ महिन्यांनी किल्ल्यात साथीचा आजार पसरला आणि रघुनाधपंत यांनी राजकारण करत काही होन घेत हा किल्ला अब्दुल्लाखान याच्याकडून मराठ्यांच्या ताब्यात घेतला...
वेल्लोर ही विजयानगरची शेवटची राजधानी १६७८ ते १७०७ पर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला १७१० मध्ये अर्काटच्या नबाबाने किल्ला ताब्यात घेतला नबाबाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले सध्याही त्यांचे वंशज तेथे राहत आहेत त्यांना नबाब म्हणूनच ओळखले जाते त्यानंतर प्लासीच्या लढाईवेळी हा किल्ला ब्रिटिशांकडे आला..या किल्ल्या मध्ये भारतीय राजघराण्यातील बंदिवान व्यक्तींना ठेवले जात असे श्रीलंकेचा राजा विक्रमसिंघे यालाही येथे १५ वर्षे कैदेत ठेवण्यात आले होते...
ह्यावर सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन...,
“येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट...”

